शिंदे-गव्हाणेवस्ती जि . प. प्रा. शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

सांगोला, तालुक्यातील अकोला केंद्रातील जि. प. प्रा. शाळा शिंदे-गव्हाणेवस्ती येथे १६ जून रोजी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत अकोला गावचे सरपंच धनश्री गव्हाणे व शिक्षणतज्ञ् विठ्ठलराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रवेशोत्सवाची सुरवात प्रभातफेरीने झाली. नवीन विद्यार्थ्यांना सजविलेल्या चारचाकी गाडीतून संपूर्ण गाडीतून मिरवणुकीने शाळेत आणण्यात आले. यानंतर सर्व नवीन विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आकर्षक फेटे बांधण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या, ज्यावरून चालताना त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

शाळेत आगमन झाल्यावर मुलांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले. आणि त्यांचे औक्षण करून त्यांना शाळेत आणण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून अकोला गावच्या सरपंच धनश्री गव्हाणे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सोनाली आसबे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते पहिल्याच दिवशी मोफत गणवेश व पुस्तके वाटप करण्यात आली.

विद्यार्थ्यांसाठी विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये गोड पदार्थ म्हणून जिलेबी आणि नेहमीच पौष्टिक शालेय पोषण आहार देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश घोंगडे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. प्रवेशोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय शास्त्रे आणि माता-पालक यांचे अनमोल सहकार्य लाभले.