सांगोला येथे पती-पत्नीस घरात घुसून कोर्टातील केस माघारी घे म्हणून मारहाण 

अनिल सर्जेराव वगरे यांची भाची सुजाता नितीन मेटकरी (रा. खुपसंगी, ता. मंगळवेढा) हीस माहेरच्या लोकांकडून त्रास होत असल्याने तिने १३ मार्च २०२४ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत सुजाता हिचे वडील उत्तम भाऊ माने (रा. आगलावेवाडी, ता. सांगोला) यांनी माहेरच्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्याच्या कोर्टात तारखा सुरू आहेत. दरम्यान, गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास सचिन सोपान मेटकरी, नितीन सोपान मेटकरी, मच्छिंद्र मेटकरी, गणेश पडळकर (सर्व रा. खुपसंगी, ता. मंगळवेढा) तसेच इतर तीन अनोळखी व्यक्ती असे एक काळ्या रंगाची बुलेट व एक काळ्या रंगाची स्कार्पिओमधून आले.

त्यावेळी त्या सर्व जणांनी फिर्यादी अनिल वगरे यांना शिवीगाळ करून तुला लय मस्ती आलीय काय, कोर्टातील केस माघारी घे, नाहीतर आम्ही तुला जीवे मारणार, असे म्हणून सर्व लोकांनी काठ्या, कुऱ्हाडी घेऊन जबरदस्तीने घरात घुसले. नितीन सोपान मेटकरी याने शिवीगाळ करून कोर्टातील केस माघारी घे आणि उत्तम मानेला आमची मुले आमच्या ताब्यात द्यायला सांग, नाहीतर तुझा कार्यक्रम करतो, असे म्हणाला. जाताना घरासमोर लावलेली चारचाकी गाडी व दुचाकीचे नुकसान केले. तर खिडकीच्या काचा फोडून निघून गेल्याची घटना गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास भोईटे वस्ती, कडलास रोड, सांगोला येथे घडली आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.