जय हनुमान पतसंस्थेने सामाजिक उत्तरदायित्व जपल्याचे गौरवोद्गार

जागतिक घडामोडीने पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढून देशात सर्वच वस्तूंच्या किंमती वाढू शकतात. दिवसेंदिवस रुपयाचे अव मूल्यन होत असल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होत आहेत. त्यामुळे देशातील बँका आणि पतसंस्थांना सावध व्हायला हवे, असे आवाहन माजी अर्थमंत्री आ. जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथील समारंभात केले. जय हनुमान पत संस्थेने विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. येथील जय हनुमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या मार्केट यार्ड शाखेच्या स्थलांतर इमारतीचा उद्घाटन समारंभ झाला. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील, माजी नगराध्यक्ष स्व. विजय पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.

आ. पाटील पुढे म्हणाले, देशात ६० रुपयांचा १ अमेरिकन डॉलर ८७ रुपयांवर गेला आहे. दिवसेंदिवस रुपयाची कमी होणारी किंमत हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या देशाच्या २१० लाख कोटीच्या कर्जाच्या परतफेडीसाठी महसूल वाढविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यातून देशात काही नवे प्रश्न निर्माण होऊ शकतात. जय हनुमान पतसंस्थेने राजकारण विरहीत कारभार करीत चांगला विस्तार केला असून आपले वेगळेपण सिध्द केले आहे. शहाजीबापू पाटील म्हणाले, एका छोट्या खोलीत सुरू केलेल्या पतसंस्थेने आ. जयंतराव पाटील यांच्या आशिर्वादाने ९१ कोटीपर्यंतचा टप्पा गाठला आहे. पतसंस्थेच्या तिन्ही शाखांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा देताना शहराच्या विकासाला हातभार लावला आहे.