रस्ते करताना ड्रेनेजचे चेंबर गायब …

इचलकरंजी, शहरातील अनेक लहान-मोठे रस्त्यांचे डांबरीकरण त्याचबरोबर सिमेंट काँक्रीटकरण करण्यात आले आहे. सदरचे काम करताना प्रशासनाने अथवा संबंधीत मक्तेदारांनी कोणतेही नियोजन अथवा खबरदारी घेतल्याचे दिसून येत नाही. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. अनेक भागात नव्याने केलेल्या रस्त्यांवरील ड्रेनेजची चेंबरच गायब झाले आहेत. त्यामुळे ड्रेनेज कुठे लिकेज झाले हे समजून येत नाही. अनेक ठिकाणी मैलायुक्त सांडपाणी गटारीमधून तसेच नळातून येत असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. तेव्हा एखादी साथ येण्यापूर्वी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

 
शहरात कोट्यवधी रूपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक लहान मोठे रस्ते डांबरीकरण तसेच सिमेंट काँक्रीटकरण करून करण्यात येत आहे. अनेक रस्त्यांचे काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारीही झाल्या. जुने रस्त्याचे खुदाई करून नविन रस्ते करणे आवश्यक होते. परंतु तसे न करता जुन्या रस्त्यावरच नव्याने रस्ते करण्यात आल्याने अनेक भागात रस्ते उंच तर गटारी रस्त्याखाली झाल्या आहेत. तसेच अनेक घरे रस्त्याच्या लेवलला न रहाता त्यांची लेवल चुकली आहे. त्यामुळे पाण्याचा योग्यपणे निचरा होत नसल्याचे दिसून येत आहे.

 
शहरातील निम्म्या भागात ड्रेनेजची सोय आहे. त्याभागामध्ये नव्याने डांबरीकरण व सिमेंट काँक्रीटीकरण करून रस्ते करताना कोणतेही नियोजन नसल्याचे दिसून येते. त्यामध्ये प्रामुख्याने ज्या भागात ड्रेनजची लाईन गेली आहे. त्याभागातील ड्रेनेजचे चेंबरची जागा खुली सोडून अथवा चेंबरची उंची वाढवून नव्याने रस्ते करणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाने तसेच संबंधीत मक्तेदाराने ‘दिसला रस्ता कर डांबरीकरण’ अशा पध्दतीने काम केल्याने ड्रेनेजची चेंबरचं नाहीसे झाले आहेत. त्यामुळे अनेक भागात ड्रेनेज चोकअप झाले आहे की नाही हे समजून येत नाही. अनेक ड्रेनेजमधून मैलायुक्त सांडपाणी गटारीमधून तसेच विविध नळाव्दारे येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामध्ये गावभाग परिसरातील नागरिकांच्या वाढत्या तक्रारी असून दुषित पाण्यामुळे अनेकांना कावीळ, गॅस्ट्रो डेंगू या सारखे आजार होत आहे. तेव्हा महानगरपालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून चेंबर ज्या ठिकाणी पूर्णपणे झाकले गेले आहे तेथे चेंबरची उंची तातडीने वाढवावी अशी मागणी होत आहे.