आष्ट्यात बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचे उद्घाटन

लोकसभा मतदारसंघातील सुमारे सातशे गावात आजपर्यंत कोट्यावधी रूपयांची विकास कामे झाली. मात्र मी मंजूर केलेल्या निधीतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने झालेल्या स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचे उद्घाटन म्हणजे दीपस्तंभासारखे काम असून खासदार म्हणून नव्हे तर एक शिवसैनिक म्हणून मला याचा सार्थ अभिमान वाटतो, हे स्पर्धा परीक्षा केंद्र युवकांसाठी माईलस्टोन ठरेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे खास. धैर्यशिल माने यांनी केले. आष्टा येथे पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू केलेल्या स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्राचे उद्घाटन करण्यात झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार हे होते.

नगरसेवक वीर कुदळे यांच्या संकल्पनेतून हे स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्र उभे करण्यात आले आहे. खास. माने पुढे म्हणाले, रस्ते, गटारी, धरणे, पेव्हींग ब्लॉक, खडीकरण, डांबरीकरणामुळे शहरांचा आणि गावांचा भौगोलिक विकास होतो. मात्र युवकांच्या बुध्दीला आणि ज्ञानाला विकसित करण्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांसहित देशाची उज्ज्वल पिढी निर्माण होणे आवश्यक आहे. शिवसेनाप्रमुख यांच्या नावाने होणाऱ्या या स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रातून भविष्यात शेकडो अधिकाऱ्यांची फौज तयार होऊन जनतेच्या सेवेसाठी सज्ज असेल. शासनाच्या नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर झालेल्या पंचवीस लाख रूपयांच्या निधीतून स्वतंत्र हे केंद्र सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले. 

यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेतून उत्तीर्ण झालेल्या जयश्री वीर कुदळे, आकाश मेथे, उजमा मुल्ला, अभिजित सोनार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सागर मलगुंडे, डॉ. सतीश बापट, अमोल पडळकर, दिलीप कुरणे, राकेश आटुगडे, रयत क्रांतीचे पांडुरंग बसुगडे, डॉ. नंदकुमार, गणेश माळी, निवास खोत, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.