आष्टा येथील दलित महासंघाचे पाल ठोक आंदोलन स्थगित

नागाव रस्त्यालगत असणाऱ्या झोपडपट्टीतील १०० कुटुंबांना नागरी सुविधा मिळाव्यात, या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने पाल ठोक आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनानंतर प्रशासन सक्रिय झाले असून, विविध विकासकामांना गती मिळाली आहे. मागण्या मान्य झाल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे डॉ. सुधाकर वायदंडे यांनी सांगितले. नगरपालिका व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली तसेच वीज कनेक्शन, स्वच्छता, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन यासंदर्भात लेखी आश्वासने दिले. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अमित पाटणकर यांनी तात्पुरत्या वीज जोडण्या देण्याचे लेखी पत्र दिले.

नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते यांनी झोपडपट्टीतील शौचालय स्वच्छता, दुरुस्ती व नवीन दरवाजे बसविले. जुन्या पाईपलाईन दुरुस्ती व नवीन पाईपलाईनसाठी निविदा प्रक्रिया राबवून दोन महिन्यांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर वायदंडे यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याचे जाहीर केले. यावेळी अशोकराव गायकवाड, सदाभाऊ चांदणे, सुनील मोरे, संभाजी मस्के, नारायण वायदंडे, राजेंद्र घस्ते, अमोल लोखंडे, गुलाब सय्यद, राजेंद्र वायदंडे, संदीप अवघडे, तुळशीराम बागडी, पप्पण बागडी आदी उपस्थित होते.