मुंबईत सध्या अर्थसंकल्पीय अधिवशेन सुरू आहे. त्या अधिवेशनात सांगोला विधानसभा मतदारसंघातील कामाबाबत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विविध प्रश्न उपस्थित करत ते लवकरात लवकर सोडविण्याची मागणी राज्य सरकारकडे केली. ठिबक अनुदान, छावणी चालकांची प्रलंबित बिले, सांगोला तालुक्यातील माण, कोरड्या नद्यांना कालव्याचा दर्जा देऊन कायमस्वरूपी पाणी सोडावे. प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन उभारावे, शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, दूध उत्पादकांना तिसया टप्प्यातील अनुदान द्यावे.
कर्नाटकाच्या धर्तीवर दुधाला कायमस्वरूपी तीन रुपये अनुदान द्यावे, सांगोल्याला नवीन २५ एसटी बस मिळाव्यात, जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरुस्ती करावी, अशा अनेक मागण्या सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात केल्या. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला. या स्मारकाबाबत हालचाली होत नसल्याने मराठी माणूस दुखी होत आहे. हे स्मारक तातडीने उभारण्यात यावे. तसेच, मुंबईत विधीमंडळाच्या आवारात सांगोल्यातून अकरा वेळा निवडून आलेले स्व. गणपतराव देशमुख यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
ते स्मारक लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी केली होती. विधीमंडळाच्या आवारात स्व. गणपतराव देशमुख यांचे स्मारक उभारण्याबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूतोवाच केले होते. त्याला दोनअडीच वर्षांचा काळ लोटला तरी अद्याप स्मारकाच्या कामाबाबत कोणतीही हालचाल होऊ शकलेली नाही, त्यामुळे गणपतराव देशमुखांचे स्मारक कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारला स्मारकाबाबतची आठवण करून दिली. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूतोवाच केले होते.
