आष्टा पालिकेकडून थकबाकीसाठी दुकान गाळे सील 

आष्टा नगरपरिषदेने चालू आर्थिक वर्ष व मागील वर्षातील थकीत दुकान गाळाभाडे व कराच्या वसुलीसाठी नगरपरिषद मालकीच्या शॉपिंग सेंटरमधील दुकान गाळे सील करण्याची मोहीम सुरू केली असल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांनी दिली. राशिनकर म्हणाल्या, शहरांमध्ये वेगवेगळ्या भागात असणाऱ्या शॉपिंग सेंटरमध्ये एकूण २९६ व्यापारी दुकान गाळे आहेत. हे गाळ्यांचे भाडे हा नगरपरिषदेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. परंतु अद्यापही बऱ्याच
दुकान गाळेधारकांनी गाळाभाडे व गाळे कराची रक्कम भरणा केलेली नाही.

त्यामुळे शनिवारी विलासराव शिंदे शॉपिंग सेंटर इमारतीमधील थकबाकीदारांचे दुकान गाळे सीलबंद करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. दुकान गाळेधारकांनी कटू कारवाई टाळण्याच्या दृष्टीने तात्काळ थकीत रकमेचा भरणा करून नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन राशिनकर यांनी केले आहे. यावेळी प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते, कर निरीक्षक दीपाली चव्हाण यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.