इस्लामपूर येथे अपघातात मुलाचा मृत्यू, आई गंभीर

इस्लामपूर-आष्टा रस्त्यावर प्रकाश हॉस्पिटलसमोर मोटारीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वसंत रामचंद्र बोरगे ( वय ४०, बोरगेवाडी, ता. शिराळा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात वसंत यांच्या आई आक्काताई (वय ६०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवार, दि. ७ रोजी सायंकाळी हा अपघात घडला होता. याप्रकरणी मोटारचालक संतोष शामराव होनमोरे (रा. सलगरे, ता. मिरज) याच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

शुक्रवारी वसंत व त्यांची आई आक्काताई प्रकाश हॉस्पिटल येथे आले होते. तेथील काम आटोपून ते घरी जाण्यासाठी निघाले होते. हॉस्पिटलजवळील बसथांब्याकडे जात असताना इस्लामपूरकडून आलेल्या मोटारीने (एमएच ०९, बीबी ८२२९) या दोघांना जोराची धडक दिली. या अपघातात वसंत यांच्या डोक्याला, पाठीला गंभीर मार लागला, आक्काताई यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. दोघांना उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान वसंत यांचा मृत्यू झाला.