आष्टा पालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमा; राकेश आटूगडे यांची मागणी

आष्ट्यातील नागरिकांची प्रशासकीय कामाबाबत होणारी गैरसोय टाळण्यासाठी आष्टा पालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आष्टा शहराध्यक्ष राकेश आटुगडे यांनी केली आहे. ते म्हणाले, कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने सर्वसामान्य जनतेचे मोठे हाल होत आहेत. शहराच्या विकासाला गती मिळण्यासाठी जनतेचे प्रश्न तत्काळ सुटण्यासाठी शासनाने आष्टा पालिकेत कायमरुवरूपी मुख्याधिकारी नेमावा, २०२१ सालापासून आष्टा नगरपालिकेत प्रशासकाची नियुक्ती झाली आहे.

इस्लामपूरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रशासक म्हणून काम पाहतात तर पालिकेचे मुख्याधिकारी सहाय्यक प्रशासक दिसतात. गेल्या अनेक महिन्यापासून संबंधित मुख्याधिकारी हे रजेवर आहेत त्यामुळे नागरिकांची अनेक कामे, शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रभारी मुख्याधिकारी नियुक्त असून देखिल पुरेशा आधिकारा अभावी नागरिकांची अनेक कामे तात्काळ होताना दिसत नाहीत. नागरिकांना एका कामासाठी अनेकदा हेलपाटे मारावे लागत आहेत. पालिका प्रशासनाच्या कारभारावर कोणाचेही नियंत्रण दिसत नाही याचा नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. अशातच नगरपालिका निवडणुका आगामी काळात होणार असल्याने नगरपालिकेत राजकीय द्वेषाने अशोभनीय वाद विवाद होत आहेत.

संबंधित मुख्याधिकारी हे सतत रजा वाढवून घेत आहेत. शहरात कोट्यवधीची विकास कामे सुरु आहेत. या कामावर कोणाचेही नियंत्रण दिसत नाही, तेंव्हा नगरपालिकेला नवीन मुख्याधिकारी कायमस्वरूपी नियुक्त करावा. हा प्रश्न आठ दिवसात मार्गी न लागल्यास आम्ही आष्टा शहर शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) वतीने आष्टा नगरपालिकेसमोर मुख्याधिकारी बदली व नवनियुक्ती यासाठी बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.