नैसर्गिक आपत्ती पंचनाम्यास विनापरवाना गैरहजर राहणाऱ्या ग्रामसेवकास कारवाईची नोटीस…

दि.27 मे रोजी आ.समाधान आवताडे यांनी नैसर्गिक आपत्ती कोसळलेल्या विविध ठिकाणी सकाळी 9 पासून ग्रामीण भागाचा दौरा सुरु केला. पाठखळ येथे आल्यानंतर त्यांना मंडलाधिकारी, तलाठी व ग्रामसेवक हे जबाबदार शासकीय कर्मचारी कोणीच नुकसानीचे पंचनामे प्रसंगी उपस्थित नसल्याने आमदार यांनी संबंधीत अधिकार्‍यांना जाब विचारत नैसर्गिक आपत्ती नुकसान पंचनामा प्रसंगी गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यावर थेट कारवाईची मागणी केली. मंगळवेढ्यात आलेल्या रेमल वादळाने मोठ्या प्रमाणात घरावरील पत्रे उडाले तसेच झाडे व विजेचे पोल उन्मळून पडले.

काही ठिकाणी वीज पडून जनावरे मेल्याची नैसर्गिक घटना घडल्याने सदर नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना शासनाकडून मदत मिळावी हा उदात्त हेतु ठेवून आ.समाधान आवताडे यांनी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा आयोजित केला होता.या पाहणी दौर्‍या दरम्यान पंचनामे करणेकामी पाठखळ येथील मंडल अधिकारी, तलाठी,ग्रामसेवक आदी शासकीय जबाबदार कर्मचारी उपस्थित नसल्याने आ.आवताडे यांनी थेट गटविकास अधिकारी यांना फोन करुन संबंधीत ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी केल्याने कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी ग्रामसेवक अरुण मोरे यांना रजेमध्ये विनापरवाना गैरहजर असलेबाबत खुलासा नोटीस काढली आहे.