मार्च महिन्यात आटपाडी तालुक्यामध्ये उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने उर्वरित तीन महिन्यांमध्ये पिण्याचे पाणी, जनावरांना चारा व शेतीविषयक समस्या जाणवू नयेत यासाठी महसूल प्रशासन सज्ज असून दुष्काळ निवारणासाठी सर्व विभागनिहाय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांनी लोकमतशी बोलताना दिली. सागर ढवळे म्हणाले, आटपाडी तालुका हा वारंवार दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. आणि त्यामुळे महसूल विभाग व इतर संबंधित यंत्रणांमार्फत महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या जात आहेत. पाणीटंचाई निवारण करण्यासाठी मनुष्य व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी टंचाईसदृश परिस्थिती असलेल्या गावची टँकर मागणी व अहवाल यानुसार त्वरित कारवाही करून उपविभागीय अधिकारी यांच्या मान्यतेने टँकर पुरवला जाईल.
त्या गावातील जलकुंभ व विहिरींचे जलस्तर मोजणी करून उपयोगक्षम विहिरींचा उपयोग केला जाईल. नागरिकांचे आरोग्य व स्वच्छता उपाय करताना दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रणासाठी आरोग्य तपासणी शिबिरे, ग्रामपातळीवर स्वच्छता मोहिमा या सोबतच इतर विशेष उपाय दुष्काळग्रस्त गावांची यादी तयार करून विशेष आर्थिक मदत प्रस्तावित करणे, जिल्हाधिकारी कार्यालयातून नियंत्रण व समन्वयातून नागरिकांच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन / कंट्रोल रूम उभी करण्यात येणार असून ग्रामपातळीवर पाणी नियोजन समित्यांची स्थापना करण्यात येणार असल्याचे सागर ढवळे यांनी सांगितले.