शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे करण्याचे निश्चित झाल्याने या परिसराच्या विकासाची दिशा बदलणार आहे. पायाभूत सुविधा, नवी निवासी संकुले, नवी बाजारपेठ बहरण्याबरोबरच दुष्काळी पट्ट्यातील शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा बहरही यातून फुलणार आहे. अनेक वर्षापासून विद्यापीठाच्या उपकेंद्राचा प्रश्न रेंगाळत पडला होता. हे उपकेंद्र आपल्याच भागात व्हावे यासाठी जिल्ह्यातील अनेक गावांची मागणी होती. मात्र महामार्गालगत असणारी मुबलक जमीन, मुबलक पाणी, मध्यवर्ती ठिकाण व उपलब्ध असणाऱ्या शासकीय इमारती यामुळे हे उपकेंद्र खानापूर येथेच व्हावे अशी खानापूरसह लगतच्या अनेक तालुक्यातील लोकांची मागणी होती.
अखेर या लढ्याला यश आले असून बुधवारी हे उपकेंद्र खानापूर येथेच होणार अशी घोषणा शासनाने केली. या उपकेंद्रात नवीन पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या घटकाला याचा उपयोग होणार असून शैक्षणिक क्रांती घडण्यास मदत होणार आहे. या परिसरातील अनेक मुली आर्थिक अडचणीमुळे पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेण्यापासून वंचित राहत होत्या. या उपकेंद्रामुळे या मुलींच्या शिक्षणाला गती मिळणार आहे. उपकेंद्र परिसरामध्ये विविध खेळांच्या सोयी, सुविधा उपलब्ध झाल्यास या परिसरातील खेळाडूंची क्रीडा गुणवत्ता वाढणार आहे. उपकेंद्रामुळे खानापूरसह दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, माण, खटाव, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे.