वाळवा तालुक्यातील बहे येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मारकाचा विषय आता राजकीय भोवऱ्यात अडकला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवश्यक निधीची घोषणा केली, मात्र स्मारक उभारण्यासाठी जागेचा पत्ता नाही. तरीसुद्धा नेते मात्र स्मारकाअगोदरच श्रेयवाद लाटण्याच्या शर्यतीत पुढे आले आहेत. बहे ग्रामपंचायतीत माजी मंत्री जयंत पाटील यांची गेल्या २० वर्षांहून अधिककाळ सत्ता आहे. परंतु, वेगवेगळे गट असल्याने नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष आहे. गावचा विकास संथगतीने सुरू आहे. त्यातच आता क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मारकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बळीराजा शेतकरी संघटनेने उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून निधी मंजूर करून आणल्याचा दावा केला आहे. याउलट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने निधीचे श्रेय लाटले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे समर्थक स्मारकासाठी जागाच नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे स्मारक उभारण्याअगोदरच बहे येथील राजकारण पेटले आहे. बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य प्रदेश युवा अध्यक्ष गणेश शेवाळे यांनी क्रांतिसिंहांच्या स्मारकासाठी लढा सुरू केला आहे. त्यामुळेच अजित पवार यांनी ५ कोटी रुपये निधी मंजूर केल्याचा दावा शेवाळे यांनी केला आहे.
त्यांनी बहे आणि इस्लामपुरात पेढे आणि साखर वाटून आनंदोत्सव केला असतानाच हा निधी अजित पवार गटानेच खेचून आणल्याचा दावा केला जात आहे. एकंदरीत ग्रामपंचायतीत जयंत पाटील यांचे वर्चस्व असतानाही विरोधकांनी निधीवरून श्रेय घेण्यास सुरुवात केली आहे.