अति पावसामुळे आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डाळिंब बागांचे मोठे नुकसान! पीकविम्याचीच अपेक्षा

कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून आटपाडी तालुक्याची ओळख होती. अशातच कमी पावसाच्या पाण्यावर माळरानावर येणारे, कमी रोग व खर्च व उत्पन्न हमखास असणारे डाळिंब पिकाला शेतकरी वर्गाने पसंती देत लागवड केली. शेतकरी या पिकाच्या लागवडीमधून समृद्ध होऊ लागला. लागवड वाढली, पाणी कमी पडू लागले. यातच टेंभू योजनेचे पाणी येऊ लागले तशी शेती फुलू लागली.मात्र लहरी हवामानाच्या कचाट्यात डाळिंब शेती सापडू लागली. पाण्याच्या दुर्भिक्षतेमध्येही उत्तम डाळिंब निर्माण करून ते निर्यातक्षम करण्याची कला शेतकऱ्यांच्या मध्ये होती. आता पाणी आले आहे. शेती फुलू लागली आहे.

डाळिंब क्षेत्र वाढले मात्र शेतकरी संकटात सापडला आहे. अनियमित पडणाऱ्या पावसाने फुल गळती, कुजवा, मररोग, यासह अन्य रोगांचा प्रादुर्भाव डाळिंब बागेवर झाला आहे. चार महिने चालणारा पाऊस जूनच्या सुरुवातीला हवा तेवढा येतो मात्र पुन्हा सारखाच बरसत राहिल्याने डाळिंब बागेत योग्य फळधारणाच होत नाही. शेतकरी मोठ्या आशेने महागडी औषधे फवारणी करतो. मात्र पावसाच्या पाण्याने बागेवर विविध रोगांनी अतिक्रमण केलेले असते. दररोज फवारणी करून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले जाते. मात्र शेतकरी पुढील आशेवर खर्च करत राहतो. मात्र डाळिंबाचा प्रति झाड शेतकऱ्यांना अपेक्षित असणारा उतारा मिळत नसल्याने हवालदिल होत आहे. 

आटपाडीसारख्या दुष्काळी अवर्षणग्रस्त प्रदेश असणाऱ्या भागातील आर्थिक संजीवनी देणाऱ्या डाळिंब पिकाला लहरी पावसाचा फटका बसला असून जुलै ते ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डाळिंब बागेत योग्य फळधारणाच झाली नसल्याने उतारा कमी निघू लागला आहे.परिणामी आठ ते दहा लाख रुपये उत्पन्न निघणाऱ्या शेतकऱ्यांना आता घातलेला खर्चही परवडेना झाला आहे. तर आता पीक विम्याचाच आधार मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.