उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल इचलकरंजी दौऱ्यावर होते. त्यांनी महानगरपालिकेत विविध विषयांशी संबंधित आढावा बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या सभागृहात घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भविष्यातील २० ते २५ वर्षांचा विचार करुन विकास योजना राबवावी, अशा सूचना दिल्या. इचलकरंजी महानगरपालिकेसाठी आवश्यक असणारे अग्निशमन वाहन खरेदीच्या प्रस्तावाला लगेचच मान्यता देण्याच्या सूचना नगरविकास विभागाचे मुख्य सचिव गोविंदराज यांना त्यांनी बैठकीतूनच फोन करून दिल्या.
पंचगंगा घाटाच्या सुशोभीकरणाचे काम चांगले व दर्जेदार होण्यासाठी चांगला कॉन्ट्रॅक्टरदाराचे नेमणूक करा. शक्य असल्यास घाटाचे बांधकाम आरसीसी मध्ये करा, जेणेकरुन नदी घाटावरील दगड मोकळे होणार नाहीत. इचलकरंजी प्रवेशद्वार उभारताना या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची उंची बघून घेऊन त्या दृष्टीने प्रवेशद्वाराचे डिझाईन बनवा. पिण्याचे पाणी व शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना गतीने राबवा, अशा सूचना देऊन आरोग्य, शिक्षण, अंतर्गत रस्ते, वीजपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आदी बाबतीत महानगरपालिकेने लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अजित पवार यांनी दिले.
जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे प्रशासक अमोल येडगे व आयुक्त पल्लवी पाटील यांनी इचलकरंजी महानगरपालिकेतील कामांच्या सद्यस्थितीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. खासदार धैर्यशील माने दूरदृश्यप्रणाली द्वारे बैठकीत सहभागी झाले. बैठकीला माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा कोल्हे शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले तसेच महसूल व महानगरपालिकेतील अधिकारी उपस्थित होते.