इचलकरंजी येथे गुरूवारी उपलब्ध होणार प्राचीन सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन

इचलकरंजी येथे ऐतिहासिक आणि पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन उपलब्ध होणार आहे. गुरुवारी ३ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत येथील नामदेव भवन याठिकाणी हे दर्शन सर्व भाविकांसाठी खुले राहणार आहे. यादिवशी सायंकाळी ६.३० वाजता नामदेव भवन येथे प्रख्यात गायिका सुमेरू संध्या सिंगर यांच्या सोबत भव्य सत्संग आयोजिला आहे. या कार्यक्रमाला श्री श्री रविशंकर यांचे ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दर्शक हाथीजी आणि वेद विज्ञान महाविद्यापीठमधील पंडितजी उपस्थित राहणार आहेत.

महंमद गझनीने १०२६ साली सोमनाथ ज्योतिर्लिंगावर यशस्वी आक्रमण केले होते. परंतु, मंदिरातील ज्योतिर्लिंगाचे अंश स्थानिक पुजाऱ्यांनी सुरक्षित ठेवले होते. हे अंश शेकडो वर्षे गुप्त ठेवून त्यांच्या पूजेची परंपरा अखंड सुरू राहिली. १९२४ साली हे अंशकांची शंकराचार्य यांना दाखवण्यात आले. त्यांनी हे अंश १०० वर्षे अधिक काळ सुरक्षित ठेवून, २०२४ मध्ये श्री श्री रविशंकर यांच्याकडे पुनःस्थापनेसाठी देण्याचा सल्ला दिला होता. या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या महाशिवरात्रीला बंगळुरू येथील आश्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी सोमनाथ ज्योतिर्लिंगावर रुद्राभिषेक करून त्याचे भव्य दर्शन भारतभर सुरू केले.

इचलकरंजी व परिसरातील नागरिकांनी ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासह सत्संगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनायक मुरदंडे तसेच स्वयंसेवक नमिता हुल्ले, राहुल रायनाडे, नारायण जोशी, विजय साळुंखे, गोपाल चांडक, महेश सारडा, सूर्यकांता खंडेलवाल यांच्यासह सर्व प्रशिक्षक, स्वयंसेवक यांनी केले आहे.