इस्लामपूर शहरासह वाळवा, शिराळा तालुक्यात अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. नागरिकांच्या तक्रारी असतानाही इस्लामपूर पोलीस दुर्लक्ष करतात. इस्लामपूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात सांगली पोलिसांना २८ किलो गांजा सापडतो. परंतु इस्लामपूर पोलिसांना याचा थांगपत्ताही लागत नाही. अवैध धंदे करणाऱ्यांना इस्लामपूरसह वाळवा तालुका सुरक्षित वाटतो. याला पो. नि. संजय हारुगडे हेच जबाबदार असल्याचा आरोप भाजप नेते विक्रम पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला.
विक्रम पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत वाळवा तालुक्यात गुंडगिरी, अवैध धंदे चालू देणार नाही. लोक सुरक्षित राहतील असा जनतेला विश्वास भाजपने दिला होता. मात्र इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पो. नि. संजय हारुगडे यांच्या आशीर्वादामुळे वाळवा तालुक्यात अवैध धंदे सुरू आहेत. व्यसनाला तरुण पिढी आहारी जात आहे. तरुण पिढी बरबाद होण्याला पोलीस निरीक्षक संजय हारुगडे जबाबदार आहेत. अवैध धंद्याच्या विरोधात भाजप महिला पदाधिकान्यांनी २४ मार्चला आत्मदहन आंदोलन केले होते. महिलांना आत्मदहन आंदोलन करायला भाग पाडणे हे दुर्दैव आहे.
पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हारुगडेनी केला आहे. पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे तक्रार केली आहे. यावर लवकरच निर्णय होणार आहे. पत्रकार बैठकीस भाजपचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील, अशोक पाटील, शिवाजी पाटील, कपिल सूर्यगंध उपस्थित होते.