हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे ट्रकच्या धडकेत विजेचा पोल कोसळला; विज पुरवठा खंडीत

तारदाळ येथील समर्थनगर गल्ली नं. १ येथे गुरूवारी सकाळी ११ वाजणेच्या सुमारास सुताची अवाढव्य बाचकी भरलेल्या ट्रकने रस्त्याकडेला असलेल्या विजेच्या पोलला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की तो सिमेंटचा विद्युत पोल तुटून ट्रकवर जोरात आदळला. यामुळे भागातील ७-८ तास विजपुरवठा बंद झाला होता. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या प्रकारामुळे भागातील नागरिकांनी ट्रकला रोखून धरले. संबंधित महावितरण कर्मचाऱ्यांना बोलावून सदर घटनेचा पंचनामा करण्याचे सांगितले.

महावितरणचे कॉन्ट्रॅक्टर यांनी सदर झालेल्या नुकसानीबाबत २० हजार ५०० रूपयांचे इस्टिमेट काढून नुकसान भरपाई वसुल करून घेतली. या भागात मोठी नागरी वस्ती आहे. तसेच सायझिंग आणि यंत्रमाग कारखाने असून येथे जाण्यासाठी अरुंद रस्ता आहे. तरी देखील या रस्त्यावरून संबंधित कारखानदाराकडून अवजड वाहने नेऊन लोकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षे सुरू आहे. या संबंधित भिषण समस्येकडे वाहतूक विभाग व स्थानिक प्रशासन कारवाई करणार काय असा प्रश्न नागरिकातून उपस्थित होत आहे.

बुधवारी दिवसभर तारदाळ- शहापूर या मुख्य रस्त्यावर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर माल वाहतूक करणाऱ्या वाहतुकीस अडथळा होईल अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली होती. तरीदेखील काही मुजोरी ट्रकचालकांकडून अशाप्रकारे बेकायदेशीर मालवाहतूक केली जात आहे.