इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील ललित कला अकादमीचे पुरस्कार जाहीर 

राजारामबापू पाटील ललित कला अकादमी (महाराष्ट्र राज्य) हि या संस्था राज्याचे माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने स्वर्गीय बापूंच्या स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारे लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान पुरस्कार अकादमीचे निमंत्रक कवी प्रा. प्रदीप पाटील व ज्येष्ठ सदस्य, कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर.डी. सावंत यांनी पत्रकाद्वारे घोषित केले. साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाकरिता मराठी भाषा व सांस्कृतिक इतिहासाचे प्रसिद्ध अभ्यासक डॉ. रमेश वरखेडे (नाशिक) यांना लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला जीवन गौरव सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे.

लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान पुरस्कार नाट्य क्षेत्रातील योगदानाकरिता प्रसिद्ध नाटककार अभिराम भडकमकर (मुंबई), कवितेतील योगदानाकरिता प्रसिद्ध कवयित्री व चित्रकार डॉ. मीनाक्षी पाटील (मुंबई), आदिवासी साहित्य संशोधनातील योगदाना करिता आदिवासी साहित्याचे अभ्यासक डॉ. तुकाराम रोंगटे (पुणे) यांची निवड करण्यात आली आहे. लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला विशेष सन्मान पुरस्कार लेखन व मराठी भाषेच्या प्रसाराकरिता लेखक अनिल सामंत (गोवा) आणि लेखन व मराठी साहित्य प्रसाराकरिता लेखक प्रकाश जडे (मंगळवेढा) यांना देण्यात येणार आहे. प्रसिद्ध विचारवंत व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या निवड समितीने या सन्मान पुरस्कारांची निवड केली आहे. 

राजारामबापू पाटील ललित कला अकादमी आणि गोवा विद्यापीठ शणै गोंयबाब महाशाळा मराठी अध्ययन शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा विद्यापीठामध्ये ११ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता होणाऱ्या समारंभामध्ये प्रमुख पाहुणे गोवा राज्याचे मुख्यमंत्री ना. डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते तर आ. जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व अतिथी ‘कुलगुरु डॉ. हरिलाल मेनन, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, कला शाखेच्या अधिष्ठाता प्रो. डॉ. अनुराधा वागळे, मराठी अध्ययन शाखेचे प्रमुख डॉ. विनायक बापट, राजारामबापू पाटील सह. साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.