हातकणंगले तालुक्यातील शहापूर तारदाळ रोडवर अभिराज या नावाने असलेल्या खासगी सायझिंग युनिटमधून प्रक्रिया केल्यानंतरचे केमिकलयुक्त पाणी थेट विहिरीजवळील मोकळ्या जागेत सोडण्यात आले आहे. या दूषित पाणी विहिरीत मिसळल्याने संपूर्ण विहिरीचे पाणी खराब झाले. त्यामुळे विहिरीतील ऑक्सिजनची पातळी कीमी झाली आणि शेकडो मासे मृत झाले. मासे पाण्यावर तरंगताना दिसताच स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाला दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या दूषित पाण्यामुळे मासेच नव्हे, तर मानवी आरोग्यालाही धोका निर्माण होऊ लागला आहे. याचे उदाहरण म्हणजे सायझिंग जवळच असणाऱ्या बोअरींगला देखील दुषीत पाणी येत असल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. तसेच मुख्य रस्त्याकडेला दूषित पाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने अनेक साथीच्या रोगांना आमंत्रण मिळत आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत ग्रामपंचायतीने सायझिंग युनिटवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार दाखल करावी. दरम्यान, संबंधित युनिटचा पंचनामा करण्यासाठी महसूल व पर्यावरण विभागाचे अधिकारी यांना घटनास्थळी बोलवावे अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.