हातकणंगले तालुक्यातील आळते येथील रामलिंग-धुळोबा रस्त्यासाठी उद्या रास्तारोको

हातकणंगले तालुक्यातील आळते येथे तब्बल ७ ते ८ महिन्यापूर्वी रामलिंग – धुळोबा रस्त्यासाठी साडेसहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत परंतु ठेकेदाराने अजून रस्त्याचे काम सुरू केलेले नाही. त्यामुळे रामलिंग व धुळोबा देवालयासाठी जाणाऱ्या भाविकांना खड्ड्यातून मार्ग काढत जावे लागत असल्याने बांधकाम विभागाच्या विरुद्ध माजी जि. प. सदस्य अरुणराव इंगवले व रामलिंग, धुळोबा, अलंमप्रभु, कुंथुगिरी व सिद्धोबा देवालयाच्या भाविकांनी व आळते गावच्या ग्रामस्थांनी सांगली – कोल्हापूर मार्गावरील हातकणंगले गावच्या हद्दीतील रामलिंग फाटा येथे सोमवार ७ रोजी रस्ता रोको करण्याचा इशारा निवेदनातून बांधकाम विभागाला दिला आहे.

बुधवार १६ एप्रिल रोजी धुळोबा देवालयाची यात्रा आहे. यात्रेसाठी हजारो भाविक येत असतात सध्या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली असून खड्डे चुकवत भाविकांना प्रवास करणे अतिशय मुश्किल झाले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊनही रस्त्याचे काम सुरू झालेले नसल्याने आळते ग्रामस्थांनी व भाविकांनी सोमवार ७ रोजी रस्ता रोको आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे.याबाबत हातकणंगले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांनी आंदोलकांना रस्त्यासाठी अल्प निधी असल्याने ठेकेदार काम करण्यास अनुकूल नसून रस्ता वाहतुकीस सुस्थितीत ठेवणेबाबत संबंधित ठेकेदाराला कळविले असल्याचे लेखी आश्वासन दिले आहे. मात्र आंदोलक रस्ता रोको आंदोलनाच्या भूमिकेवर  ठाम आहेत.