हातकणंगले तालुक्यातील आळते येथील रामलिंग रस्त्यासाठी मोर्चेकऱ्यांकडून अधिकारी धारेवर

आळते येथील श्री रामलिंग, धुळोबा, अल्लमप्रभु देवालयासह कुंथुगिरी तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी जि.प. सदस्य अरुणराव इंगवले व त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाविकांनी हातकणंगले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवाजी पाटील यांना निवेदन देऊन तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी मोर्चेकऱ्यांनी उपअभियंता शिवाजी पाटील यांना धारेवर धरत वर्षभरापूर्वी मंजूर होवून सुद्धा रखडलेल्या रस्त्याच्या कामाबाबत अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. यावेळी उपअभियंता पाटील व त्यांचे कार्यालयीन अधिकारी निरुत्तर झाले. 

सुरवातीला हातकणंगले सार्वजानिक मोर्चा आल्यानंतर कार्यालयाबाहेर उपअभियंता शिवाजी पाटील यांनी येऊन रखडलेल्या रस्त्याबाबत खुलासा करण्याचा प्रयत्न केला. पण मोर्चेकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेव्हा मोर्चेकऱ्यांनी ठेकेदार उपस्थित का राहिला नाही. ठेकेदारावर तुमचा वचक नसल्याचा आरोप करत त्यांना फोन लावण्याची मागणी केली. त्यावेळी ठेकेदाराने मोबाईलवरून उडवाउडवीचे उत्तर दिल्याने मोर्चेकरी आक्रमक झाले. अखेर उपअभियंता पाटील यांनी श्रीधुळोबा देवालयाची यात्रा १६ एप्रिलला असून तत्पुर्वी रस्त्यावरील खड्डे भरून रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवण्याचे काम सुरु केले आहे.

तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याचे काम करण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्याने मोर्चेकऱ्यांनी मोर्चा स्थगित केला. या मोर्चात आळतेचे सरपंच अजिंक्य इंगवले, उपसरपंच अमित पाटील, अजित कोळाज, विजय पांडव, रोशन कांबळे, विकी कांबळे, अंकुश कांबळे, विनायक तेली, शीतल हावळे, अमर इंगवले, नगरसेवक राजू इंगवले, मयूर कोळी, रमजान मुजावर, दीनानाथ मोरे, उमेश सूर्यवंशी यांच्यासह आजी-माजी सदस्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.