हातकणंगले तालुक्यातील तारदाळ गावात चोरी; लाखोंचा ऐवज लंपास

तारदाळ गावातील जावईवाडी परिसरात नामदेव आण्णा कोळी हे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत. शनिवारी सकाळी ते आपल्या कुटुंबीय समवेत नातेवाईकांकडे बाहेरगावी गेले होते. त्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कडी उचकटून घरामध्ये प्रवेश केला व घरातील तिजोरीमधील असणारे दोन तोळे सोन्याचे बोरमाळ, दहा हजार किमतीचे चांदीची गणेशाची मूर्ती, चांदीचे नाणे तसेच रोख रक्कम अंदाजे पाच हजार रुपये इतका लाखोंचा माल चोरांनी लंपास केला.

कोळी कुटुंबीय मंगळवारी सकाळी आपल्या घराजवळ आले असता, त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी गावकामगार पोलीस पाटील संतोष लोहार यांच्याशी संपर्क साधला. यावेळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तारदाळ व परिसरामध्ये मागील काही दिवसापासून अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील व बोअरींगला असणाऱ्या केबल सुद्धा चोरी होण्याचे प्रमाण वाढत आहे.

या सर्व प्रकारांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन, पोलिसांनी गावात गस्त वाढवावी व चोरांचा छडा तात्काळ लावावा, अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.