कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटलांनी घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आलेत. २४ डिसेंबर पहाटे ४ पासून हे बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. तर ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी आदेश लागू असणार आहे
अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी बंदीचे आदेश दिले आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण द्या या मागणीसाठी राज्य सरकारला २४ डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला होता. जरांगे पाटील यांनी दिलेली ही मुदत उद्या संपत आहे. मात्र अद्यापही मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.
सरसकट आरक्षण आम्ही ठाम असून आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारकडे आज आणि उद्याचा दिवस आहे. किती दिवस आम्हाला आरक्षणासाठी झुलवत ठेवणार, आमच्या संयमाची वाट पाहू नका, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये ‘निर्वाणीचा इशारा’ सभा होणार आहे. या सभेत ते काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलंय.