आटपाडी महसूलची क्यूआर कोडद्वारे संपर्क यंत्रणा कार्यान्वित; तहसीलदार सागर ढवळे यांचा नावीन्यपूर्ण उपक्रम

आटपाडी तालुक्यातील महसूलचे अधिकारी भेटत नसल्याने सामान्य लोकांच्या किरकोळ कामांना विलंब होत आहे. त्यामुळे आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांनी क्यूआर कोड स्कॅन करा व थेटअधिकाऱ्यांशी संपर्क साधा, असा विधायक उपक्रम सुरु केला आहे त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांनी मुख्यमंत्री १०० दिवस कृती कार्यक्रम नागरी सेवाचे सुलभीरण अंतर्गत हा विधायक उपक्रम सुरु केल्याने लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागरिकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.

महसूल विभागाचा कणा असणारे तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी आणि लोकांची बहुतांश वेळा भेट होत नाही. ग्राम महसूल अधिकारी यांना दोन तीन गावांचा कारभार बघावा लागतो. महसूल विभागाची बैठक आणि नियमित कामकाजात ही मंडळी अनेकवेळा व्यस्त असल्याने नागरिकांना अनेकवेळा किरकोळ कामासाठी हेलपाटे घालावे लागतात. त्यामुळे तहसीलदार सागर ढवळे यांनी आपल्या कार्यालयात त्यांचा स्वतःचा आणि तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांच्या व्हाट्सअप क्यू आर कोड असलेला फलक लावला आहे.

सध्या सर्वच लोकांच्याकडे स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे हा क्यू आर कोड वापरून त्यांना संपर्क करता येणार आहे. तहसीलदारांच्या या उपक्रमामुळे नागरिकांचा त्रास कमी आहे.