विहिरीवर पोहायला (swimming) गेलेल्या दोघांचा आधार देण्याच्या प्रयत्नात मिठी मारल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अजय पपन बागडी व केराप्या धोंडिबा बागडी अशी मृतांची नावे आहेत. आष्टा बडगांव रोडवरील मस्के मळ्यात बुधवारी दुपारी दोन च्या सुमारास ही घटना घडली. याबाबत आष्टा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. बागडी कुटुंबीय मूळचे आंध्रप्रदेश येथील. अनेक वर्षापासून ते आष्टा नागाव रस्ता येथील झोपडपट्टी बसाहतीत राहतात. हे कुटुंबीय चिनीमातीच्या बरण्या विक्री करतात.
केराण्या व अजय हे नात्याने चुलते पुतणे होते. केरप्पा, अजय व वसाहतीतील पाच सहा मुले जगन्नाथ मस्के यांच्या विहिरीवर पोहण्यासाठी (swimming) गेले होते. केरप्पा याला पोहता येत नव्हते. पाण्यात उडी मारल्यानंतर केरण्या गटांगळ्या घेऊ लागला. त्याच्या तोंडाला फेस आला. त्याला वाचवण्यासाठी अजय गेला, केराप्पाला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघे ही पाण्यात बुडाले, ते वरती आलेच नाहीत. ही बाब लक्षात येताच पोहायला गेलेल्या मुलांनी आरडा ओरड केली. मोबाईलवरून नातेवाईकांना माहिती दिली.
नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलीस व महसूल विभागाला माहिती दिली. दोन मुले पाण्यात बुडाल्याच्या बातमीने तहसीलदार व आष्टा पोलीस घटनास्थळी पोहोचले. सांगली येथील रेस्क्यू टीमने मृतदेह विहरीबाहेर काढले. मृतदेह पाहताच नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. केराप्या व अजय हे दोघेही आष्टा परिसरासह पलूस, विटा, तासगाव, कवठेमहंकाळ जत पर्यंत मोटारसायकल वरून बरणी विक्री करीत कुटुंबाची गुजराण करीत होते. केराप्पा विवाहित असून त्याला दोन वर्षाची मुलगी व चार महिन्याचा मुलगा आहे. अजय हा अविवाहित होता. तो व आई दोघे झोपडीत राहायचे, काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.