विटा, गलाई व्यवसायाचा समावेश मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत करणार असून गलाई बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. येथील जय माता दी मंगल कार्यालयात नॅशनल गोल्ड अॅण्ड सिल्व्हर रिफायनर्स अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनतर्फे गलाई बांधवांचा देशव्यापी महामेळावा झाला.
उद्योगमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, ज्यावेळी लोक काश्मीरला जायला घाबरत होते, त्यावेळी गलाईबांधवानी लाल चौकात दुकान सुरू करण्याचे धाडस केले होते. गलाईबांधवांची ताकद आम्हा सर्वांना माहित आहे. त्यामुळे आम्ही जरी वेगळ्या पक्षात असलो तरी तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आहे. या पुढच्या काळात गलाई व्यवसाय हा पारंपारिक पद्धतीने न करता आधुनिकतेने करून वाढवला पाहिजे. भविष्यात गलाईबांधवांसाठी क्लस्टर करायचा असेल तर गलाई बांधवानी आपल्या भागातच थांबले पाहिजे ही माझी भूमिका आहे. भविष्यात सोन्यावर प्रक्रिया करणारे उद्योग एमआयडीसी सुरू झाले पाहिजे. जगातीलं सोन सांगली सातारामध्ये आलं पाहिजे अशी भूमिका घ्यायची असेल तर उद्योग विभाग तुमच्या सोबत असेल.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गलाई व्यवसाय हा मराठी माणसाचा व्यवसाय आहे. गलाई व्यवसायाला सरकार दरबारी सन्मान मिळाला पाहिजे. सन्मान जनक वागणूक मिळायची असेल तर त्यासाठी संघटित झालं पाहिजे. प्रतापशेठदादांचे स्वप्न पूर्ण करण्याचा विडा सतीश साळुंखे यांनी उचलला आहे. गलाई व्यवसायाचा प्रश्न हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. गलाईबांधवांचे प्रश्न केवळ सांगली आणि साताऱ्याच्या खासदारांनी मांडून सुटणार नाही. त्यासाठी देशभरातील खासदारांपुढे गलाई व्यवसायातील प्रश्नांचे व्यवस्थित सादरीकरण झाले पाहिजे. तरच ते मार्गी लागतील. स्वागत कार्याध्यक्ष बळवंत माने यांनी तर प्रास्ताविक असोसिएशनचे अध्यक्ष गणपतराव पुदाले यांनी केले. महामेळाव्यास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आ. सुहास बाबर, रांका ज्वेलर्सचे सर्वेसर्वा फत्तेचंद रांका, इंडियन असोसिएशन ऑफ हॉलमार्किंग सेंटरचे अध्यक्ष उदय शिंदे, नॅशनल गोल्ड अॅण्ड सिल्व्हर रिफायनर्स अँण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय समन्वयक सतीश साळुंखे, प्रकाश पाटील, संजय माने, संदीप घोरपडे उपस्थित होते. नॅशनल गो सील्ड अॅण्ड सिल्व्हर रिफायनर्स अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे संचालक नागेश देवकर, बापूसाहेब बुरसे जाधव, सुरेश सूर्यवंशी, लक्ष्मण पाटील, शांताराम शिंदे, दत्तात्रय देवकर, महादेव सुर्वे, शिवाजी जाधव उपस्थित होते.
