जनतेच्या प्रश्नांचा निपटारा करा: आ. आवताडे सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक

सोलापूर (Solapur) जिल्हा नियोजन समितीची बैठक ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झाली. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अनेक विकासात्मक प्रश्नांवर आवाज उठवत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करुन जनतेच्या प्रश्नांचा निपटारा करण्याची मागणी बैठकीत आमदार समाधान आवताडे यांनी केली. दरम्यान मतदार संघातील सर्व प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री गोरे यांनी दिली.

आरटीओ खात्यांतर्गत स्थानिक वाहने व शेतकऱ्यांच्या वाहनांवर दंड आकारण्यात येऊ नये. टेंभू योजनेचे पाणी माण नदीत सोडून पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील धरणे भरून मिळावीत. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी ५ ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात यावी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने मधील पंढरपूर आणि मंगळवेढा येथील जवळपास दोन हजार शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा स्तरावर पाठवूनही मंजूर नाहीत सध्या पेरणी काळ सुरु असल्यामुळे ते तात्काळ मंजूर करुन संबंधित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान योजनेचा निधी मिळावा अशी मागणी केली.

आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण होत आली आहेत परंतु महावितरण आणि एमजीपी यांच्यात समन्वय नसल्यामुळे लोकांना अजूनही पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. मंगळवेढा टेल अंतर्गत १.२७ टीएमसी पाणी मंजूर असूनसुद्धा केवळ ०.२७ इतकेच पाणी मंगळवेढा तालुक्यासाठी मिळते. म्हैसाळ पाणी वाटप योजने अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील १९ गावांना आवश्यक दाबाने योग्य ते पाणी मिळवण्याची तरतूद लवकरात लवकर करण्यात यावी.

सर्वसामान्यांची कामे आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्व कामे लवकर मार्गी लावावीत अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी खासदार, जिल्ह्यातील आमदार यांच्यासह जिल्हाधिकारी, कार्यकारी मुख्य अधिकारी, नियोजन अधिकाऱ्यांसह प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते.