बस चालकास मारहाण केल्याचा ठपका; पोलीस कॉन्स्टेबल कलायगार निलंबित

एसटी बसला ओव्हरटेक करण्यास संधी न दिल्याचे कारण विचारणाऱ्या बस चालकाला मारहाण केल्याप्रकरण पोलिस कॉन्स्टेबल असिफ कलायगार याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी काढले आहेत, अशी माहिती शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली.

चार दिवसांपूर्वी कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर मलकापूर आगाराची एसटी बस घेऊन चालक नितीन शिरगावकर हे कोल्हापूरहून मलकापूरच्या दिशेने जात होते.त्याच दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल असिफ कलायगार हे पत्नीसह चारचाकी गाडीतून मलकापूरच्याच दिशेने जात होते. वाघबीळपासून चालक एसटी पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत होते. पण कलायगार यांनी एसटीला पुढे जाण्याची संधी दिली नाही. काही वेळानंतर एसटी पुढे घेत चालक शिरगावकर यांनी कलायगार याला साईड द्यायची नाही का? असे विचारले. त्यावर कलायगार दाम्पत्याने एसटी चालक शिरगांवकर यांना शिवीगाळ करत मारहाण केली होती.