एकाच फिल्ममध्ये ‘या’ अ‍ॅक्टरनं साकारल्यात 45 भूमिका, रचला वर्ल्ड रेकॉर्ड

दाक्षिणात्य सिनेसृष्टीनं नेहमीच आपल्या अनोख्या कथा आणि दमदार अभिनयानं प्रेक्षकांना भूरळ घातलीय. हल्ली बॉलिवूडपेक्षाही साऊथ सिनेमांसाठी प्रेक्षक गर्दी करतात. असाच एक सिनेमा, ज्यानं सर्वांना आश्चर्यचकीत केलं आहे. या चित्रपटात एका अभिनेत्यानं दोन-तीन नव्हे तर 45 वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. हा अभिनेता रजनीकांत नाही, कमल हसनही नाही किंवा गोविंदा नाही. मग हा अभिनेता आहे तरी कोण? ‘दशावतारम’मध्ये 10 भूमिका साकारून लोकांना आश्चर्यचकित करणाऱ्या कमल हासनचं नाव सर्वात आधी येतं, पण कमल हसनचा हा विक्रमही या अभिनेत्यानं मोडला आहे. हा विक्रम जॉन्सन जॉर्जनं मोडला आहे.

45 भूमिका साकारल्या

जॉन्सननं ‘आरानू नजन’ या मल्याळम चित्रपटात एकाच वेळी 45 भूमिका साकारून इतिहास रचला. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला आणि जरी तो बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नसला तरी, त्याच्या अनोख्या सादरीकरणामुळे तो चर्चेत राहिला. हा चित्रपट पीआर उन्नीकृष्णन यांनी दिग्दर्शित केला होता. ‘आरानू नजन’चे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आणि हा चित्रपट खास आहे, कारण जॉन्सननं महात्मा गांधी, येशू ख्रिस्त, स्वामी विवेकानंद, लिओनार्डो दा विंची सारख्या अनेक ऐतिहासिक आणि प्रभावशाली पात्रांची पडद्यावर साकार केली होती. सुमारे 1 तास 47 मिनिटांच्या या चित्रपटात त्यांच्यासोबत जयचंद्रन थगजीकरण आणि मुहम्मद नीलांबूर देखील आहेत.

जॉन्सन यांचा वर्ल्डरेकॉर्ड

जॉन्सन जॉर्जची ही कामगिरी आजपर्यंत कोणीही मोडू शकलेली नाही. जर तुम्हाला काहीतरी वेगळे आणि आश्चर्यकारक पहायचं असेल, तर ‘आरानू नजन’ तुमच्यासाठी एक उत्तम अनुभव असू शकतो. मल्याळम चित्रपट ‘आरानू नजन’ हा एक अनोखा आणि मनाला चटका लावणारी ड्रामा फिल्म आहे, जो स्वतःचा शोध आणि अस्तित्वाच्या प्रश्नांभोवती गुंफलेला आहे. या चित्रपटात अभिनेता जॉन्सन जॉर्जनं एकाच वेळी 45 वेगवेगळ्या पात्रांची भूमिका साकारून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. चित्रपटाचं संगीत आणि गाणी चित्रपटाच्या भावना आणि संदेश प्रभावीपणे सादर करतात.

चित्रपटाची मुख्य कथा ग्लोब मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसाबद्दल आहे. हे पात्र जगभर प्रवास करतं आणि त्याच्या खांद्यावर एक ग्लोब घेऊन जातं, जे त्याच्या ओळखीचं आणि उद्देशाचं प्रतीक आहे. एक दिवस, ती व्यक्ती महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर उभा राहतो आणि अचानक त्याला जाणीव होते की, तो गांधी बनला आहे. या अनुभवानंतर, त्याला जाणवतं की, तो विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वांना आत्मसात करू शकतो. चित्रपटात तो महात्मा गांधी, येशू ख्रिस्त, स्वामी विवेकानंद, लिओनार्डो दा विंची इत्यादी 45 वेगवेगळ्या पात्रांमध्ये रूपांतरित होतो. प्रत्येक पात्राद्वारे, चित्रपट ‘मी कोण आहे?’ आणि ‘माझी खरी ओळख काय आहे?’ असा प्रश्न उपस्थित करतो.