इचलकरंजी, सार्वजनिक गटार स्वच्छतेकडे महानगरपालिका आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. याचबरोबर कचरा संकलनासाठी घंटागाडी वेळेवर येत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त जात आहे. याशिवाय काही भागामध्ये ड्रेनेज चेंबर तुंबल्याच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे सार्वजनिक गटार स्वच्छतेबरोबरच घराघरातील कचरा संकलन दररोज करणे गरजेचे आहे. मात्र, अनेक भागात सार्वजनिक गटार स्वच्छतेकडे सतत दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. याशिवाय कचरा संकलनासाठी येणारी घंटागाडी देखील नियोजित वेळेत येत नसल्याने नागरिकांना कचरा टाकणे अवघड बनू लागले असून अनेक भागात सध्या कचऱ्याचे ढिग दिसू लागले आहेत. स्वच्छता तसेच कचरा उठावासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. मात्र, ठेकेदाराकडून वेळेवर कचरा उठाव केला जात नाही. त्याचबरोबर महापालिका कर्मचाऱ्यांकडून सार्वजनिक गटार देखील स्वच्छता करण्यास चालढकल केली जात आहे. काही भागात सफाई कर्मचारी गैरहजर असल्याचे तसेच बदली केल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याठिकाणी दुसरा कर्मचारी नसल्याने गटर तुंबून पाणी रस्त्यावर येताना दिसत आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता आहे. जवाहरनगर, लंगोटे मळा, गांधी कॅम्प परिसर, आंतरभारती विद्यालय, सुतार मळा, गावभाग टाकवडे वेस, नदीवेस नाका परिसर आदि अनेक ठिकाणी सार्वजनिक गटारांची वेळेवर स्वच्छता केली जात नाही. त्याचबरोबर अनेक भागात घंटागाडी येत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. प्रभागातील मुकादमांसह स्वच्छता निरिक्षकांकडूनही केवळ पाट्या टाकण्याचे काम केले जात असल्याने सफाई कामाचे तीन तेरा वाजत असल्याचे दिसत आहेत. घंटागाडी चालकांकडून होणारा बेशिस्तपणा नागरिकांना त्रासदायक ठरताना दिसत आहे. त्यामुळे यासंबंधीची दखल घेऊन कामात सुसूत्रता आणावी, अशी मागणी केली जात आहे.
