धक्कादायक! दारूच्या नशेत पतीने गळा दाबून केला पत्नीचा खून…….

अलीकडे गुन्हेगारी प्रकारात वाढ होत असतानाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चक्क पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. वारंवार भांडणाऱ्या पतीने पत्नीला अमानुष मारहाण करत गळा दाबून खून (Murder Case) केल्याची धक्कादायक घटना घडली.करिष्मा किसन गोसावी ( रा. गोसावी गल्ली) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पती किसन गोसावी (मूळ रा. म्हैशाळ ता. मिरज) हा पसार झाला आहे. करिष्मा यांचा थांगपत्ता लागत नसल्याने शोध घेतला असता भाड्याच्या कुलूपबंद खोलीत तिचा मृतदेह विद्रूप अवस्थेत मिळाला. किसन गोसावी हा पत्नी करिष्माबरोबर तीन लहान मुलांसह सासरवाडीत राहत होता.

दोघांमध्ये वारंवार वाद होत. संग्राम चौक परिसरात एका घरात ते दोन महिन्यांपासून भाड्याने राहत होते. सोमवारी (ता.१७) दिवसभर सुरू त्यांचा वाद सुरू होता. दरम्यान, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास किसन याने पत्नीला बेदम मारहाण केली. भागातील नागरिकांनी मध्यस्थी करत भांडणे थांबवली. काल सकाळी दोन्ही आठ वर्षांच्या मुलांना किसन याने सासरवाडीत नातेवाइकांकडे सोडले आणि पत्नी करिष्मा बाहेर गेली असून, मुलांना जेवण देण्यास सांगितले. त्यानंतर तो निघून गेला. मात्र, सायंकाळ झाली तरीही किसन आणि करिष्माही मुलांना घेण्यासाठी परतली नाहीत.

काही काळ नातेवाइकांनी दोघांची वाट पाहिली. मात्र, नियमित वाद घालणाऱ्या किसनचा संशय आल्यानंतर करिष्माची शोधाशोध सुरू झाली. भाड्याच्या खोलीत पाहिले असता खोलीही कुलूपबंद होती. अखेरीस रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नातेवाइकांनी भाड्याच्या खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घटनास्थळी शिवाजीनगर पोलिस दाखल झाले. पोलिस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी पाहणी केली.

भागातील नागरिक, नातेवाइकांनी घराबाहेर मोठी गर्दी केली होती. किमान १२ तासांपूर्वी किसन याने पत्नी करिश्माचा खून करून खोलीत बंद केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. किसन गोसावी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून मिरज भागात त्याच्यावर चोरीची गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.