सांगोल्याच्या आठवडी बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ! नागरिकांतून संताप

सांगोला शहरातील आठवडी बाजार हा रविवारी असतो आणि हा आठवडी बाजार मोबाईल तसेच दागिने चोरी करणाऱ्या चोरट्यांसाठी पर्वणी ठरत असल्याचे अलीकडे दिसून येत आहे. त्यामुळे शहरवासीयातून सांगोला पोलीस स्टेशनच्या शहर बीटणे लक्ष घालण्याची मागणी जनतेतून व्यक्त होऊ लागली आहे.

रविवारी आठवडी बाजार भरतो आणि या बाजारात चोरटे मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी आपला हात साफ करत असल्याच्या घटना घडत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दर रविवारी आठवडी बाजारात मोबाईल चोरी होण्याचे प्रकार घडत आहेत आणि मोबाईल चोरीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकांना संबंधित पोलीस कर्मचारी यांच्याकडून प्रश्नांचा भडीमार करण्याचे प्रकार सुरू असल्याचे देखील कळत आहे.

आरोपींचा शोध घेण्याऐवजी फिर्यादीची उलट चौकशीचा प्रकार सुरू असल्यामुळे अनेक नागरिक हे चोरीची तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचे पाहण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक मोबाईल चोरट्यांनी हातोहात लंपास केले आहेत.

मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना एखादा अपवाद वगळता सपशेल अपयश आले असल्याचे दिसून येत असून गर्दीचा फायदा घेत रविवारी आठवडी बाजारातून मोबाईल, पर्स, दागिने तसेच मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

चोरट्यांनी घातलेला धुमाकूळ शहरवासीय व नागरिक व्यापारी यांना त्रास होत आहे. त्यामुळे बाजारातील गस्त वाढवावी अशी मागणी देखील नागरिकांतून होत आहे. जेणेकरून आठवडा बाजारात येणाऱ्या नागरिकांचे मोबाईल तसेच मौल्यवान वस्तू, दागिने चोरीच्या घटना घडणार नाहीत.