मालट्रकच्या धडकेत दुचाकीवरील बहीण -भावाचा अंत

लाकडाची वाहतूक करणाऱ्या मालट्रकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील चुलत बहीण -भावाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला . शाळा सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हा अपघात घडल्याने सर्व गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान अपघातानंतर चालक ट्रक जागेवरच सोडून पळून गेला.

हा अपघात सोमवारी (दि. १६) सायंकाळी ५. ३० च्या सुमारास सोनंद ते गळवेवाडी (ता. सांगोला) जाणाऱ्या रोडवरील शेख वस्तीनजीक घडला. पल्लीवी चंद्रकांत गवळे (वय १८) आणि गुरुप्रसाद रमेश गवळे वय १३, दोघेही रा. गावलेवाडी, ता. सांगोला अशी मृतांची नावे आहेत. मृत पल्लवीचे वडील रमेश म्हतारबा गवळे यांनी पोलिसात खबर दिली आहे.

गळवेवाडी येथील मृत पल्लवी गवळे ही घरातून दुचाकीवरून सोनंद गावातील सोनंद हायस्कुल येथे चुलत भाऊ गुरुप्रसाद याला शाळेतून आणण्यासाठी अली होती. ते दोघे घराकडे जात असताना सायंकाळी ५ वाजता वाटेत गळवेवाडीकडून सोनंदकडे भरधाव निघालेल्या लाकडाची वाहतूक करणाऱ्या मालट्रकने शेख वस्तीजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला . अपघातात पल्लवी व गुरुप्रसाद हे दोघेही मालट्रकच्या उजव्या बाजूच्या पाठीमागील चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोनंदकडून पाठीमागून येणाऱ्या दुचाकी स्वाराने मृत पल्लवीच्या वडिलांना अपघाताची माहिती दिली.