अजित पवारांसोबत युती करण्यासंदर्भात शरद पवारांनी स्पष्टच सांगून टाकलं

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा रंगली आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळातून वेगवेगळे दावे केले जात असताना, आता स्वत: शरद पवार यांनी त्यावर भाष्य केलं आहे. संधीसाधुपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाही असं सांगत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे युतीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसंच भाजपाशी काही संबंध ठेवू नका असं म्हटलं आहे. पिंपरी चिंचवडमधील कार्यक्रमात ते बोलत होते.

“सगळ्यांना बरोबर घ्यायचं असा सूर आहे. त्यात काही गैर नाही. पण कोणाला बरोबर घ्यायचे हा प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महात्मा गांधी, नेहरु, चव्हाण, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार आहेत.सत्तेसाठी भाजपासोबत गेले ही भूमिका कोणी मांडत असेल तर ती मान्य नाही. कोणाशीही संबंध ठेवा, पण भाजपाशी संबंध हा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार असूच शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने संधीसाधूपणाचं राजकारण प्रोत्साहित करायचं नाही. त्या दिशेने आपल्याला पावलं टाकायची आहेत,” असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.

पिंपरीमधील आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितलं की, “यशवंतराव चव्हाण यांनी मोठ्या उद्योगपतीना या भागात उद्योग उभे करण्यासाठी विनंती केली आणि आज ही उद्योग नगरी बनली. मी राज्याचा प्रमुख असताना उद्योगांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि अनेक भागात उद्योग उभे करण्याचा निर्णय घेतला. चाकण आज उद्योगांमुळे पूर्ण बदललेले आहे. रांजणगाव मध्ये मला पडीक जमीन दिसली. त्यावेळी मी जिल्हाधिकाऱ्यांना बोलवले आणि मला रांजणगावमध्ये उद्योग उभे करायचे आहेत सांगितलं. आज रांजणगाव उद्योग नगरी बनली, सासवडमध्ये उद्योग उभे केले. ही कामं करण्यात आम्ही यशस्वी झालो”.

“आणखी एक मुद्दा नदी सुधार प्रकल्प. आज अनेक नद्यांमध्ये प्रदूषण आहे, फेस दिसतो. हे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससारखे संघटन हवं आहे. त्यासाठी महापालिका निवडणूकीत नवीन नेतृत्व तयार करायचे आहे. आपल्याला विकास करायचा आहे. त्यासाठी संघटन मजबूत करणे गरजेचे आहे. जे सोडून गेले त्यांची चिंता करू नका. माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले आहेत,” असं त्यांनी सांगितलं. 1978 मध्ये मला अनेक आमदार सोडून गेले. मी चिंता केली नाही. पुन्हा मी पक्ष उभा केला. कोणी सोडून गेले याची चिंता करू नका. जनता सुज्ञ आहेत. लोकशाही त्यांच्या मुळे जिवंत आहे”, असं शरद पवारांनी सांगितलं.

“पुन्हा पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन तयारीला लागा. निवडणुकीची काळजी करू नका, सगळ्या जागा लढवू. आपल्या सोबत जो कोणी येत असेल त्याचं स्वागत आहे. जास्तीत जास्त नवीन नेतृत्वाला संधी देऊ. महिलांसह तरुणांना संधी दिली जाईल. ज्यांनी शहराच्या वाटण्या केल्या, राजकारणात नवीन व्यवसाय सुरू केला आहे त्यांना दूर करू,” असं शरद पवारांनी सांगितलं आहे.