मृत्यूनंतर इतरांना जीवनदान देणारं गाव

रक्तदान हे श्रेष्ठदान असं आपण नेहमी म्हणतो, पण रक्तदानाइतकंच महत्त्वाचं दान आहे ते म्हणजे अवयवदान. लातूरच्या आनंदवाडी गावाने मिळून अवयवदानाची मोहिम हाती घेतली. त्यामुळे देशपातळीवर त्यांचा गौरव केला जात आहे. आनंदवाडी लातूर जिल्ह्यातलं जेमतेम लोकसंख्या असणारं गाव आहे. गाव लहान जरी असलं तरी गावकऱ्यांची कामगिरी मात्र महाराष्ट्राला अभिमान वाटावी अशी आहे. कारण अवयव दानाच्या उपक्रमात देशात अग्रेसर येण्याचा बहुमान या गावाने पटकावला आहे.

गावातील सर्वांनीच मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला आहे. आतापर्यंत या गावातील बारा जणांचं मरणोत्तर अवयव दान झालं आहे. संपूर्ण गावाने, गावातील सर्व लहान-थोर लोकांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला आहे. संपूर्ण गावाने अवयवदान केलं असून असा संकल्प करणारं आनंदवाडी हे देशातील पहिलं गाव ठरलं आहे.

मरणोत्तर अवयवदान करणं म्हणजे आपल्यामुळे अनेकांना जीवनदान (Gives life) देणं असं होईल, असा समज या गावातील नागरिकांचा आहे. अवयवदानामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन मिळतं. परंतु, याच अवयवादानाबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज असतात आणि मृत्यूनंतर अवयवदान करणं टाळलं जातं. परंतु, लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (गौर) या गावाने अवयवदानाबद्दल जगासमोर वेगळा आदर्श घातला आहे. येथील महिला कारभारनींनी गावात मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे मरणोत्तर अवयवदान करणारं आनंदवाडी हे भारतातील पहिलं गाव ठरलं आहे.

आनंदवाडी हे गाव लातूर जिल्ह्यात सामाजिक परिवर्तनात अग्रेसर असणारे गाव म्हणून ओळखलं जातं. या गावामध्ये सर्व कारभार महिलाच पाहतात. सरपंच ते ग्रामपंचायत सदस्य महिलाच आहेत. गावाने हुंडाबंदी लागू केली आहे. गावातील सर्व घरं ही महिलांच्या नावे करण्यात आली आहेत. या गावामध्ये ६५० लोकसंख्या असून ११२ कुटुंब गुण्यागोविंदाने नांदतात. शासनाच्या कुठल्याही मदतीची अपेक्षा न ठेवता सरपंच आणि इतर प्रमुख व्यक्ती त्यांच्या संकल्पनेतून केवळ गाव विकासासाठी विविध उपक्रम राबवतात.