डंपरखाली चिरडून महिला ठार

विटा(Vita) येथील विटा-तासगाव रस्त्यावर मुरूम वाहतूक करणाऱ्या डंपरच्या चाकाखाली चिरडून दुचाकी वरील महिला जागीच ठार झाली तर एकजण जखमी झाला आहे. प्रमिला धोंडीराम तांबे (वय ६५, रा. विटा) असे मयत महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

 याबाबत माहिती अशी, विट्यातील राजेंद्र धोंडीराम तांबे (वय ६२ रा. संभाजीनगर विटा) हे आपल्या दुचाकीवरून बहिण प्रमिला धोंडीराम तांबे हिच्यासोबत विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तासगाव नाक्याच्या दिशेने निघाले होते. राजेंद्र तांबे हे रेणुका किराणा स्टोअर्स जवळ आल्यानंतर पाठीमागून मुरूम भरलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. डंपरची दुचाकीला धडक बसल्यानंतर राजेंद्र तांबे हे बाजूला फेकले गेले तर त्यांच्या दुचाकी वर पाठीमागे बसलेली त्यांची बहीण प्रमिला तांबे डंपरच्या पाठीमागील डाव्या बाजूच्या चाकाखाली सापडली. या अपघातात डंपरचे चाक अंगावरून गेल्यामुळे प्रमिला यांचा जागीच मृत्यू झाला आहे. विट्यातील मुख्य ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौका जवळच हा अपघात झाल्यामुळे घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या अपघाताबाबत जखमी राजेंद्र तांबे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी डंपर चालक प्रकाश टोलू राठोड (वय ३२) याला अटक केली आहे.