शाळा सुरु होताच वाहतुक कोंडीची डोकेदुखी

इचलकरंजी, नवीन शैक्षणिक वर्षाला नुकताच प्रारंभ झाला आहे. १५ जूनपासून शाळा हायस्कूल सुरू झाले. शाळा, हायस्कूल सुरू होताच वाहतूक कोंडीची डोकेदुखी सुरू झाली आहे. तेव्हा एखादा अपघात घडण्यापूर्वी शहर वाहतूक नियंत्रण कक्षाने वाहतूक कोंडी होते त्याठिकाणी पोलिस तैनात करावे तसेच वाहतूक कोंडीपासून शहरवासीयांची कायमची सुटका करण्यासाठी उपाय योजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.


इचलकरंजी शहर हे औद्योगिक नगरी म्हणून परिचित आहे. वस्त्रोद्योगासह इतर लहान-मोठ्या उद्योगाची संख्या लक्षणीय आहे. सहाजिकच शहर परिसरात चारचाकी, तीन चाकी, अवजड वाहनांसह दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस शहराचा विस्तार वाढत चालला आहे. मात्र, शहरातील अनेक रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीला सातत्याने तोंड द्यावे लागते.शहरातील प्रमुख मुख्य रस्त्यांसह अनेक वर्दळीच्या ठिकाणी शाळा, हायस्कूल, कॉलेजसह मोठ-मोठी दुकाने, ऑफिस कार्यालय यांची संख्या मोठी आहे. शाळा, कॉलेज भरताना अथवा सुटताना मोठी गर्दी होऊन वाहतुकीची सातत्याने कोंडी होत असते. अनेक वेळा लहान-मोठे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
शहरातील विशेषत: छ. शाहू पुतळा ते कोल्हापूर रोड, ए.एस.सी. कॉलेज, हुलगेश्वरी रोड, व्यंकटराव हायस्कूल परिसर, राजवाडा चौक परिसर, गोविंदराव हायस्कूल परिसर, महासत्ता चौक परिसर, सांगली नाका परिसर आदी भागात शाळा भरताना तसेच सुटताना मोठी वाहतूक कोंडी होते. अनेक शाळा हायस्कूल, कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थीनी रिक्षा, बस मधून जात असल्याने आणि त्याचवेळी इतर वाहनांच्या वर्दळीमुळे मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तेव्हा वाहतूक कोंडीपासून मुक्तता करण्यासाठी काही ठराविक वेळेत ट्रॉफिक पोलिसांची नेमणूक करावी तसेच वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.