तारदाळ मधील सायझिंगचे दूषित पाणी ओढ्यात सोडण्यास नागरिकांच्या विरोध

तारदाळ – शहापूर रस्त्यालगत असणाऱ्या समर्थनगर परिसरातील अभिराज सायझिंग युनिट दोन मधील उत्पादन प्रक्रियेतून निर्माण होणारे केमिकल युक्त सांडपाणी ओढ्यात सोडले जात आहे. हे सांडपाणी ओढ्यात सोडल्याने पर्यावरणाला मोठा धोका होईल आणि स्थानिक जलस्रोतांवर व मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होईल. अशी भिती नागरिकांतून होत असून याला नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे.

सायझिंगसाठी वापरण्यात येणारे केमिकल्स अत्यंत हानिकारक असू शकतात. यामुळे पाणीप्रदूषण होईल, जे स्थानिक जीवजंतू, वनस्पती आणि मानवांसाठी धोकादायक ठरू शकते याच्या परिणामस्वरूप ओढ्यातील पाणी अस्वच्छ होईल, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याची शक्यता आहे. या विषयावर ग्रामपंचायत आणि स्थानिक प्राधिकरणांनी अधिक कठोर नियम व अंमलबजावणी केली जावी अन्यथा आम्हाला लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन करण्यास भाग पडेल व याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहिल, अशा आशयाचे निवेदन सरपंच सौ. पल्लवी पोवार, ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजीरे यांना समर्थनगर मधील नागरिकांनी दिले आहे.

यावेळी तारदाळ शिवसेना शहर प्रमुख अमित खोत, विनायक देसाई, संजय टेके, बाबासो खोत, योगेश वाणी, सुहास कोरे आदि उपस्थित होते. दरम्यान, सायझिंगचे केमिकल युक्त सांडपाणी खुल्या जागेत व नागरी वस्तीमध्ये सोडण्यात येऊ नये याबाबतचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील यांनी दिले आहे.