राज्यातीलच काही देशातील अनेक घटनांवर बोलणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर खानापुरातील घटना-घडामोडीवर मात्र का पळून आहेत ? खानापूर (Khanapur) तालुक्यात भाजप बळकट करण्यासाठी ते खूप झटतात , मग ते मौन का पाळतात ? जेष्ठ नेते शरद पवारांपासून जयंत पाटील यांच्यापर्यंत त्यांचे टिकास्त्र सुरु असते. उद्धव ठाकरे यांच्यापासून राज ठाकरे यांच्यापर्यंत , हिंदुत्वापासून कुंभमेळापर्यंत ते सतत काही ना काही भूमिका प्रक्षोभकपणे मांडत असतात . म्हणूनच प्रश्न पडतो घरच्या राजकीय मैदानाबाबत ते गप्प का?
खानापूर (Khanapur) तालुकयातील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पाण्यासाठी आंदोलन केले, ते गप्प राहिले. कार्यकर्त्यांनी रस्ता कामातल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन केले, ते गप्प बसले. सामान्यांच्या अन्यायाविरोधात कार्यकर्ते ओरडले, ते शांतच राहिले. इतकेच न्हवे तर पक्षातल्या गटबाजीबद्दल ते काही बोलत नाहीत . शेवटी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि वैभव पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तरीही ते बोलायला तयार नाहीत. खानापूर तालुक्यामध्ये काही वर्षापासून पक्ष वाढीसाठी आक्रमकपणे प्रयन्त करणारे भाजपचे बेधडक , निडर , मुलुख मैदानी तोफ समजले जाणारे आमदार पडळकर खानापूर तालुक्यातील कोणत्याच घडामोडीविषयी काही बोलत का नाहीत? एरवी समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमांतून दर्शन देणाऱ्या पाडळकरांना खानापूरवर बोलण्यापासून कोण रोखत आहे ?
आटपाडी तालुक्यातील गाव खेड्यातून उपेक्षित सामाजातून आलेल्या पडळकर यांनी २००४-०५ च्या दरम्यान समाजकारण , राजकारणाला सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी आक्रमकपणे प्रत्येक गोष्टीत प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान उठवले. आणि बघता बघता सामान्यांच्या आवाज म्हणून पुढे आले. त्यांनी २००९, २०१४, आणि २०१९ या तिन्ही पंचवार्षिक निवडणुकांमध्ये लोकसभा , विधानसभेसाठी उमेदवारी केली, त्यांत त्यांना यश आले नाही पण २०१२-१३ नंतर त्यांनी विट्यासह खानापूर तालुक्यात स्वतःचा गट निर्माण करायला सुरुवात केली . आजही त्यांचा गट आहे.
राष्ट्रीय समाज पक्ष त्यानंतर बहुजन वंचित आघाडी आणि आता भाजप असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. त्यांनी केलेल्या पक्षांतबरोअबर खानापूर तालुक्यातीलही अनेक कार्यकर्ते आजअखेर त्यांच्यासोबत राहिले आहेत . निर्भीड , सडेतोड बोलण्याच्या स्वभावाची लोकांना भुरळ आहे. चांगला वक्ता म्हणू त्यांना ओळखले जाते . असा नेता बोलत नसल्यामुळं पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. तालुक्यातील काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी तर पदांचे राजीनामेच दिले आहेत .
