अभिनेत्री शेफाली जरीवालाचं (Shefali Jariwala) शुक्रवारी रात्री आकस्मिक निधन झालं. ‘काँटा लगा’ गाण्यामुळे दोन दशकांपूर्वी घराघरात परिचयाचा झालेला हा चेहरा बिग बॉसच्या 13 व्या पर्वात झळकला होता. शेफालीने वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अंधेरीमधील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे शेफालीला रात्री उशीरा दाखल करण्यात आलं. मात्र तिला मृत घोषित केलं गेलं. शेफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं जात आहे.
शेफालीला घेऊन तिचा पती अभिनेता पराग त्यागी आणि इतर तीन जण रात्री उशीरा बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आले. शेफालीला मृत घोषित करण्यात आल्यानंतर तिचं पार्थिव पोस्ट मॉर्टमसाठी पाठवण्यात आलं. शेफालीच्या मृत्यूच्या बातमीनंतर तिचा पती रुग्णालयाबाहेर पडतानाचा व्हिडीओ ‘इस्टंट बॉलीवूड’ने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. कारमध्ये ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर बसलेला पराग त्यागी उदास दिसत असून डोक्याला हात लावून बसल्याचं व्हिडीओत पाहायला मिळलं.
शेफालीला परागने काही जवळच्या व्यक्तींच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करुन घेण्याआधीच मृत घोषित केलं. शेफालीच्या मृत्यूची बातमी रात्री उशीरा समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावरुन तिचा श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शेफालीला सर्वात आधी ‘काँटा लगा’ गाण्यातून लोकप्रियता मिळाली. 2008 साली शेफाली बुगी-वुगी कार्यक्रमातही सहभागी झालेली. तिने 2025 अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं. पराग आणि शेफाली हे दोघे ‘नच बलिए’ या डान्स रिअॅलिटी शोमध्येही सभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या पाचव्या आणि सातव्या पर्वात दोघेही सहभागी झालेला. त्याचप्रमाणे मध्यंतरी शेफाली अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस 13’मध्येही सहभागी झाली होती.