नळांना काळेकुट्ट, दुर्गंधीयुक्त पाणी

इचलकरंजी,  इचलकरंजीच्या पाणी पुरवठ्याला कायम ग्रहण लागलेले आहे. आठवड्यातून एकदा वेळी- अवेळी पाणी पुरवठ्यामुळे नागरिक विशेषत: महिला वर्ग त्रस्त झाला आहे. त्यामध्ये गावभाग परिसरातील टिळक रोड भागातील काही नळांना काळेकुट्ट, दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने साथीचे आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तेव्हा आयुक्त पल्लवी पाटील यांनी तातडीने लक्ष देवून पुरवठा विभागाला  सूचना द्याव्यात अशी मागणी होत आहे.

 इचलकरंजी शहराला कृष्णा नळपाणी योजना व पंचगंगा नदीतून पाणी उपसा करून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, वारंवार विद्युत पुरवठा खंडीत, पाणी लाईनला गळती आदी कारणांमुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. ‘नदी उशाला अन् कोरड घशाला’ अशी अवस्था शहरवासियांची झाली आहे. शहरवासियांना आठवड्यातून एकदा अथवा दोनदा वेळी-अवेळी पाणी पुरवठा होतो. त्यामुळे पाणी कधी व केव्हा येणार याची माहितीच नागरिकांना विशेषत: महिलांना माहिती नसते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी बोअरींगचा आधार घ्यावा लागतो. पाणी सोडावे यासाठी वारंवार आंदोलन, रस्ता रोको केले जाते. मात्र, महानगरपालिका प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. त्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या… प्रमाणे स्थिती होते. याप्रकारामुळे पाण्यासाठी संपूर्ण शहरवासिय त्रस्त झाले आहेत

 सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गत आठवड्यात गणेशनगर भागातील युवकाला जीबीएस सदृश्य आजाराची लागण झाली. त्यामुळे गणेशनगर भागात भीतीचे वातावरण पसरले होते.गावभाग परिसरातील टिळक रोड भागात गेल्या काही दिवसांपासून काही नळांना काळेकुट्ट, दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तेव्हा आयुक्त पल्लवी पाटील यांनी लक्ष देवून एखादी साथ पसरण्यापूर्वी कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

पावसाळ्यात खबरदारी घेण्याची गरज…
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. दुषित पाण्यामुळे उलटी, जुलाब, जीबीएस सारखे आजार होण्याची भीती व्यक्त केली जाते. तेव्हा महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सतर्कता बाळगण्याची गरज आहे. दुषित पाण्या संदर्भात एखादी तक्रार आल्यास तात्काळ निर्गत करणेची गरज आहे. याबाबत आयुक्त पल्लवी पाटील यांनी संबंधित विभागाला तातडीने द्यावेत, सूचना अशी मागणी होत आहे.