विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळं राज्यातील सर्वच आमदार सध्या मुंबईत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच अधिवेशनकाळात अनेक राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. पण, त्यातच एक अशी घटना समोर आली ज्यामुळं वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा एकदा आमदार संजय गायकवाड चर्चेत आले आहेत आणि यावेळीसुद्धा कारण ठरला आहे व्हायरल होणारा त्यांचा एक व्हिडीओ.
आमदार निवास आकाशवाणी येथील खानावळीत निकृष्ट जेवण दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणा येथील ( आमदार संजय गायकवाड यांनी खानावळ चालकाला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नव्हे, तर त्याचसोबत कामगार आणि मॅनेजर यांना मारहाणही केल्याचं पाहायला मिळालं.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास विधीमंडळातील कामकाज संपवून संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) जेव्हा आमदार निवासात गेले तेव्हा त्यांनी काही जेवण मागवलं होतं. उपलब्ध माहितीनुसार गायकवाड यांच्यासोबत इतरही काहीजण तिथं जेवणासाठी होते. त्यांच्याकडूनही तिथं देण्यात येणाऱ्या डाळीला वास येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र कॅन्टीनच्या मॅनेजरनं या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं.
याचदरम्यान गायकडवाडांनीही जे जेवण मागवलं होतं, त्यातही डाळ खराब झाल्याचं लक्षात आलं ज्यामुळं त्यांनी कॅन्टीन चालकाला जाब विचारला. त्याच्याकडून व्यवस्थित उत्तर मिळत नसल्याचं पाहून गायकवाडांनी त्याच्यावर हात उगारला. आमदार किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा इतका निकृष्ट असल्याची शहानिशा झाल्यानंतर गायकवाड यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आणि त्यासंर्भात अन्न व प्रशासन विभागाकडेही यासंदर्भातील, कॅन्टीन चालकाची तक्रार करण्यात येणार असल्याचं सांगितलं.
