लाल किला ते कुतुब मीनार…, दिल्लीतील ऐतिहासिक वास्तू होणार भगव्या रंगाच्या ?

दिल्लीतील भाजप आमदार तरविंदर सिंग मारवाह यांचे मोठे विधान समोर आले आहे. देशाची राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक इमारती (Historical Buildings), बाजारपेठा भगव्या रंगाच्या असतील, असे मारवाह यांनी एका निवेदनात म्हटले. ऐतिहासिक इमारतींना भगव्या रंगात रंगवले जाईल, असे त्यांनी सांगितले. लाल किल्ला, कुतुबमिनार, हुमायूनचा मकबरा, दिल्ली विधानसभा, कॅनॉट प्लेस, चांदणी चौक भगव्या रंगाच्या असतील. दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हा प्रस्ताव आणला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यापूर्वीही भाजप आमदार तरविंदर सिंग मारवाह हे त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. मी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून कावड यात्रेदरम्यान दिल्लीतील सर्व मांस आणि दारूची दुकाने बंद करण्याची मागणी केली असल्याचे भाजप आमदार तरविंदर सिंग मारवाह म्हणाले.माझे पत्र गृह मंत्रालयाला मिळाले आहे. येत्या 2-3 दिवसांत मी देशाच्या गृहमंत्र्यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले.

भाजप आमदाराने पत्रात असेही म्हटले आहे की, जर दिल्लीतील कावड यात्रेच्या मार्गावर मांस दुकाने आणि दारूची दुकाने शांततेत बंद झाली तर ठीक आहे. पण जर असे झाले नाही तर दारू आणि मांस दुकाने जबरदस्तीने बंद केली जातील. यासोबतच दुकाने जबरदस्तीने बंद करण्याचे विधान त्यांचे वैयक्तिक आहे, पक्षाचा त्यात सहभाग नाही, असेही आमदाराने स्पष्ट केले आहे.