पुण्यात शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर’ सुरू केले आहे. गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर उद्या ठाण्यातील आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमात (Anandashrama) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या मेगा प्रवेशाला ‘प्रॉमिसिंग पुणे’ असे नाव देण्यात आले आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष वाढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित मेळाव्याचे राजकीय परिणाम नेमके काय होणार याची चर्चा सुरु असताना. ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर राज्यात उत्सुकता असताना शिंदे गट पक्ष वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. त्यानुषंगाने पुण्यातील अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
वंदेमातरम संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष,ग्लोबल गणेश फेस्टिव्हलचे कार्यकारी अध्यक्ष, व्हायरल ह्या पुस्तकाचे लेखक, वक्ते आणि निवडणुक व्युहरचनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेले वैभव वाघ, हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पुण्यात प्रसिध्द असलेले पतित पावन संघटनेचे शहराध्यक्ष स्वप्निल नाईक,, गेली ३० वर्षे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करणारे उमेश गालिंदे, आरोग्य क्षेत्रातील कामासाठी वस्ती भागांमध्ये काम करणारे अभिमन्यू मैद आणि सुधीर ढमाले, हॉटेल कामगारांसाठी लढणारे संदेश पावसकर, विद्यार्थी चळवळीतील युवा कार्यकर्ते अथर्व पिसाळ, ७५००० किलो गोमांसाची तस्करी रोखल्यामुळे महाराष्ट्रात गाजलेले निलेश जाधव, स्वत: कॅन्सरशी यशस्वी दोन हात केल्यानंतर आता पूर्णवेळ कॅन्सर रुग्णांसाठी मोफत समुपदेशन करणारे कॅन्सरयोध्दा युनुस सय्यद, सतिश शिंदे, मातंग समाजाच्या युवक चळवळीत प्रसिध्द असलेले विजय गालफाडे, युवा उद्योजक दत्ता मानकर, माजी नगरसेवक अनिल बटाणे, देवेंद्र शेळके, गोरख बांदल, गौरव नवले, अनिकेत उतेकर, ओंकार मालुसरे, महेश चव्हाण, योगेश राजपुत,महेश सुर्यवंशी यांच्यासह अनेक जण प्रवेश करणार आहेत.
