विवाहित गर्लफ्रेंडला बिअर पाजली अन् मग संपवून नदीत फेकलं

एका तरुणाने त्याच्या प्रेयसीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह यमुना नदीत (River) फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी भूप सिंह यादव याला अटक केली आहे. अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या दबावामुळे त्याने हे कृत्य केल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी भूप सिंह यादव याचे अनिता देवी (वय ३५) नावाच्या एका विवाहित महिलेसोबत गेल्या तीन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. अनिताचा पती रामराज निर्मल मुंबईत काम करतो. भूप सिंहने अनिताला जमीन आणि ट्रॅक्टर देण्याचं आमिष दाखवून तिच्यासोबत पती-पत्नीसारखे संबंध ठेवले. मात्र, जेव्हा अनिताच्या मागण्या वाढू लागल्या, तेव्हा भूप सिंह त्रस्त झाला आणि त्याने तिला मार्गातून हटवण्याचा कट रचला.

भूप सिंहने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की, त्याने अनिताला नोव्हेंबर २०२४ मध्ये फतेहपूरच्या खागा पोलीस स्टेशन हद्दीतील एका भाड्याच्या खोलीत ठेवलं होतं. तो तेथे अनिताचा पती बनून जात-येत होता. परंतु ११ डिसेंबर २०२४ नंतर अनिता बेपत्ता झाली. तिच्या फोनची रिंगदेखील वाजत नव्हती. कुटुंबीयांनी अनिताचा शोध सुरू केला आणि पोलिसांना ती बेपत्ता झाल्याची माहिती दिली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात पोलिसांनी भूप सिंहला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने धक्कादायक खुलासा केला. त्याचं लग्न ठरल्यानंतर अनिता त्याच्यासाठी अडचणी निर्माण करत होती, त्यामुळेत त्याने तिला संपवलं.

अनिता भूप सिंहच्या लग्नात अडथळा आणत होती आणि सतत जमीन आणि पैशांची मागणी करत होती. त्यामुळे त्याने अनिताला ठार केलं. आधी त्याने अनिताला बिअर पाजली आणि नंतर तिची हत्या करून मृतदेह यमुना नदीत फेकून दिला. पोलिस अधीक्षक राजेश कुमार यांनी सांगितलं की, आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. तसंच, यमुना नदीत महिलेच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांची टीम सतत तपास करत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याने अनैतिक संबंधातून हे कृत्य केल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला कठोर शिक्षा देण्याची तयारी सुरू केली आहे.तसंच, बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.