कर्नाक उड्डाणपुलाचे नामांतर ‘सिंदूर’ का केले? देवेंद्र फडणवीसांनी कारण सांगितलं

‘दक्षिण मुंबईतील उड्डाणपुलाला तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर कर्नाक यांचे नाव देण्यात आले होते. परंतु इतिहासात नोंद असणारे दाखले पाहता, विशेषत: प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या साताऱ्याच्या इतिहासात उल्लेख आहे की, गव्हर्नर कर्नाक यांच्या काळात छत्रपती प्रतापसिंह महाराज, मुधोजी राजे यांच्यावर अन्याय करण्यात आला. भारतीयांवर गंभीर स्वरूपाचे खोटे आरोप लादण्यात आले. स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातील अशा काळ्या खुणा पुसण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. त्यामुळे कर्नाक उड्डाणपुलाचे नामांतर ‘सिंदूर’ (Sindoor) असे केले आहे’, असे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

दक्षिण मुंबईत मशीद रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला आणि पी. डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक उड्डाणपुलाचे सिंदूर असे नामकरण करण्यात आले आहे. या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी १० वाजता झाले. त्यावेळी ते बोलत होते. ‘दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी हा पूल महत्त्वपूर्ण आहे. या उड्डाणपुलाचे बांधकाम मुंबई महापालिकेने नियोजित कालावधीपेक्षा कमी वेळेत पूर्ण केले’, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी आणि अनेकविध मोहिमांमध्ये दाखवलेल्या सामर्थ्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने कर्नाक उड्डाणपुलाचे नामांतर केल्याचे ते म्हणाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई महापालिकेकडे पत्राद्वारे नामांतराचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला महापालिकेने मान्यता दिली. हा पूल वाहतुकीस अनुकूल असून यामुळे मुंबईतील वाहतूक सुलभ होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.