विट्यात गुटखा तस्करावर कारवाई

विटा, ता. विटा – भिवघाट रस्त्यावरील हिवरे गावच्या हद्दीत पोलिसांनी छापा टाकून बंदी असलेली सुगंधी तंबाखू, गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेली बोलेरो पिकअप गाडी असा सुमारे २८ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ऋषिकेश चंद्रकांत कदम (वय २५ रा. दरुज, ता. खटाव, जि. सातारा) याला अटक करण्यात आली आहे.विजापूर – गुहागर रस्त्यावर एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप गाडीतून घाटनांद्रेकडून भिवघाटकडे अवैध रित्या गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर बातमी मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्यासह पथकाने सापळा लावला होता.

त्यानंतर हिवरे गावचे हद्दीत विजापूर ते गृहागर महामार्गावरती तपासणी करीत असताना एक पांढरे रंगाची बोलेरो पिकअप येताना पोलिसांना दिसली. सदरची गाडी थांबवून त्यामधून ड्रायव्हर ऋषिकेश कदम याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र बोलेरो गाडीची तपासणी केली असता त्यामधून बंदी असलेली सुगंधी तंबाखू, गुटख्याच्या पुड्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सुमारे २८ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.