पेठ वडगांव, मोकळ्या जागेत उघड्यावर पत्याचा जुगार खेळणाऱ्या खोचीतील आठजणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास छापा टाकत कारवाई केली. दरम्यान, या धाडीत रोकडसह १ लाख २७ हजार ५००रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबतची फिर्याद वडगांव पोलीस ठाण्यातील अंमलदार शंकर मेनकर यांनी दिली.
खोचीतील बुवाचे वाठार गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नदीकडे गेलेल्या कच्च्या रोडच्या बाजूस असलेल्या पोल्ट्री फार्म हाऊसच्या आडोशाला पत्याचा पानांचा जुगार खेळ सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी तेथे छापा टाकत आदम गुलाब शेख (वय ७०), विलास शंकर जाखले (वय ७८), संतोष मारूती चव्हाण (वय४५), बाळासाहेब आनंदराव बाबर (वय६९), रावसो कामदेव मडके (वय ५७), प्रकाश बाळासो पाटील ( वय ६०), संभाजी शामराव पाटील (वय ५५), दादासो शंकर पाटील (वय ५५, सर्व रा. खोची, ता. हातकणंगले) यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून ५हजार १०० रूपये रोख, ६ मोबाईल ( ३८,०००), १ मोपेड (२६,५००), १ मोटारसायकल (२७,०००),१ मोटारसायकल (३०, ५००) असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक फौजदार गुंडणके करत आहेत.
